गुरांना उपचार मिळेनात
चौसाळा : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी अनेक पशुपालक आपल्या जनावरांना घेऊन येतात, मात्र त्याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी अनेकवेळा उपस्थित नसल्याने उपचाराविनाच परतावे लागत आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. याकडे अद्यापही वरिष्ठ कार्यालय लक्ष देत नाही.
रस्त्यांची दुरवस्था
सिरसाळा : येथील जिनिंगच्या पाठीमागील परिसरात खड्डे पडले आहेत. परिणामी नागरिक, वाहनधारकांना कसरत करीतच रस्ता पार करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. ग्रामपंचायत, ग्रामसेवकांचे या समस्येकडे दुर्लक्ष झाले असून स्वच्छता होत नसल्याने आजार बळावण्याची शक्यता आहे.
मुख्य चौकांमध्ये गतिरोधकाची गरज
माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांमधून केली जात आहे. परंतु, अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नियमांचा विसर
अंबाजोगाई : एस.टी. बस आता पूर्ण प्रवासी क्षमतेने धावत असली तरी बसमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना होत नसल्याने कोरोनाच्या फैलावाची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांनाही कोरोनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. मास्कचा वापरही होत नाही.
सुरळीत पाणीपुरवठा करा
बीड : शहराला पाणीपुरवठा करणारी बिंदुसरा व माजलगाव ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. असे असताना दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी शहरातील विविध भागांतील नागरिकांमधून केली जात आहे.