अंबाजोगाई : राज्यातील शेतकरी कोरोनामुळे पूर्णतः आर्थिकदृष्ट्या खचून गेलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना राबविली; पण चालू बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना घोषित केलेले ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान अजूनही दिलेले नाही. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत होईल, यासाठी प्रोत्साहनपर तत्काळ द्या, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख सुनील जगताप यांनी केली आहे.
-----------------------------
चिखलातून वाहने चालविताना कसरत
अंबाजोगाई : हा रस्ता पावसामुळे खराब झाला आहे. या रस्त्यावर शनिमंदिरासमोरच मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून, या ठिकाणाहून वाहने चालविताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर पाणी आणि चिखल झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. नगरपालिका प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. ती लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
-----------------------------
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
अंबाजोगाई : प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा फळ व भाजी विक्रेत्यांकडून सर्रास वापर केला जात आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईची नागरिकांनी धास्ती घेतली होती. मात्र, गेल्या दीड वर्षापासून ही मोहीम बंद असल्याने दुकानदार व फळविक्रेते अजूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत आहेत.
-----------------------
ग्रामीण भागासाठी बससेवा सुरू करा
अंबाजोगाई : शहरी भागातील मोठ्या गावांसाठी एस. टी. बससेवा सुरू झाली असून, ग्रामीण भागातील बससेवा कधी सुरू होईल, असा प्रश्न ग्रामीण भागातील प्रवाशांनी उपस्थित केला आहे. बससेवा सुरू नसल्याने ग्रामीण प्रवाशांना अद्यापही खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या कमी होते. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत करण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांनी केली आहे.
-------------------------------
विधवा महिलांना योजनांचा लाभ द्या
अंबाजोगाई : कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचा शोध घेऊन त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना लाभ देण्याची मागणी येथील सामाजिक संघटनांनी केली आहे.
---------------------------
वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ
अंबाजोगाई : राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात येत्या १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे वसतिगृह अधीक्षकांचे मानधन १० हजार रुपये, स्वयंपाक्यांचे मानधन आठ हजार रुपये, मदतनीस आणि चौकीदारांचे मानधन प्रत्येकी साडेसात हजार रुपये होणार आहे.