धुळीमुळे त्रास वाढला
पाटोदा : तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. समोरून एखादे वाहन गेल्यास पादचारी आणि दुचाकीचालकांना समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे.
जनावरांचा ठिय्या
धारूर : शहरातील रस्त्यांवर अनेक मार्गांवर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेक वेळा अपघात झाल्याचीदेखील उदाहरणे आहेत. ही जनावरे रस्त्यावरून हटवावीत आणि त्यांच्यासाठी कोंडवाडा सुरू करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रबी पिकांची परवड
शिरूर कासार : सतत थंडीच्या धरसोडीमुळे रबी हंगामात पेरलेल्या गहू, हरभरा पिकांची परवड सुरू आहे. पोषक वातावरण नसल्याने रोगराईची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांना थंडी आवश्यक असते. मात्र, सध्या कधी थंडी, तर कधी आभाळात खारवड येऊन थंडी गायब होणे हे पिकाला पोषक ठरत नाही.