बीड : राज्यातील अल्पसंख्याक समुदायासाठी विविध योजना राबवल्या जातात. शासनाने यासाठी वेगळा विभाग तयार केला असला तरी त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नाही. त्यामुळे जनजागृती कार्यक्रम राबवावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे मो. खमरोद्दीन यांनी केली.
स्वच्छतेची मागणी
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, रुग्णालय व परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी विशाल तोडकर यांनी केली आहे.
रस्त्याची दुरवस्था
नांदूरघाट : केज तालुक्यातील नांदूर ते चौफाळा फाटा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून, खड्ड्यांमुळे मणक्याच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे रस्ता दुरूस्तीची मागणी वेळोवेळी नागरिकांमधून होत आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पोर्टलवर नोंद करावी
बीड : कृषी विभागाच्या सर्व योजना ऑनलाईन झाल्या आहेत. याेजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, आठ अ, बँक खाते पासबुक, आधारकार्ड हे घेऊन जवळच्या महा ई सेवा केंद्रावरून महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन प्रगतशील शेतकरी कल्याण कुलकर्णी यांनी केले आहे.
रस्ता करण्याची मागणी
बीड : तालुक्यातील सात्रापोत्रा येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे बैलगाडीने शेतात जाणेदेखील कठीण बनले आहे. शेतमाल घरी आणण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे परिसरातील पांदण रस्त्याची कामे करावीत, अशी मागणी होत आहे.
हातपंप बंदच
बीड : पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातील पालसिंगण येथे असलेले हातपंप बंद अवस्थेत आहेत. या हातपंपांची दुरूस्ती करावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आलेली आहे. मात्र, दुर्लक्ष होत असल्याचे सरपंच विक्रम खंडागळे यांनी सांगितले.
मेथीचे भाव घसरले
बीड : पालेभाज्यांचे भाव घसरले असून, यामध्ये मेथीने नीचांक गाठला आहे. दहा रुपयाला दहा जुड्या याप्रमाणे विक्री केली जात आहे. त्यामुळे मेथी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी जनावरांना चारा म्हणून मेथीचा वापर केल्याचे दिसून येत आहे.