अवैधरीत्या दारू विक्री; कारवाईची मागणी
वडवणी : काही दिवसांपूर्वी बंद झालेली अवैधरीत्या दारू विक्री परिसरात जोमाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गुटखा विक्री तेजीत; कारवाई होईना
पाटोदा : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील टपऱ्या, दुकानांवर सर्रास गुटख्याची विक्री होताना दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने येथे कारवाई करणे गरजेचे आहे. मागील शहरासह तालुक्यात कारवाई झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.
स्वच्छतेची मागणी
वडवणी : शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजक बनविण्यात आले आहेत. त्यावर वृक्ष लागवड केल्याने ते सुंदर बनले आहेत; परंतु या दुभाजका शेजारी घाण झाल्याने हा परिसर अस्वच्छ दिसू लागला आहे. त्यामुळे नगर पंचायतने दुभाजकाच्या बाजूंची स्वच्छतेची मागणी नागरिकांतून होत आहे.
खड्डे बुजवावेत
बीड : तालुक्यातील चौसाळा गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांमधून खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार होत आहे; मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन डागडुजी करण्याची मागणी होत आहे. वाहनचालक, पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
वाहनचालकांकडून नियमांची अवहेलना
केज : शहर व परिसरात वाहन चालकांकडून सातत्याने नियमांची अवहेलना सुरू आहे. दुचाकी वाहने व अॅाटोरिक्षा सर्रास वाहतुकींच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र सर्रास पाहायला मिळते. शहरात तर मुख्य रस्त्यावर अनेक रिक्षांची बिनधास्त पार्किंग असते. सर्रास रस्त्यावर वाहने लावली जातात.
मोबाइलचा अतिवापर
वडवणी : ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. पालकांची इच्छा नसतानाही अभ्यासासाठी मुलांना मोबाइल द्यावा लागत आहे; मात्र डोळ्याचे व कानाचे आजार वाढत असून, एकलकोंडेपणा वाढत आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.