ग्रामीण भागातील बस सुरू कराव्यात
आष्टी : तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना बाजारपेठेच्या ठिकाणी येण्यासाठी बस उपलब्ध नाहीत. सध्या खाजगी वाहनेही कमी प्रमाणात जातात. त्यामुळे प्रवाशांना बसथांब्यावर तासनतास बसावे लागत आहे. विविध खेड्यापाड्यांतून कोणत्याही गाडीला हात करून ताटकळत उभे राहावे लागत आहे. खेड्यापाड्यांतील लोकांची परिस्थिती पाहता प्रशासनाने बससेवा सुरू करून प्रवाशांचे हाल थांबावे, अशी मागणी आहे.
बसस्थानकाची दुरवस्था
मांजरसुंबा : येथील बसस्थानकात शौचालयासह इतर सुविधांचा अभाव आहे. तसेच दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. धुळे- सोलापूर महामार्गावरील तसेच लातूर, पुणे या मार्गावरील बस येथे थांबतात. मध्यवर्ती असलेल्या स्थानकात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
फळगाड्यांचा वाहनांना अडथळा
केज : शहरातील मुख्य रस्त्यांवरच फळविक्रेते त्यांचे गाडे लावत आहेत. त्यामुळे येथून ये- जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत असून, अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत आहे. या फळविक्रेत्यांचे गाडे त्वरित तेथून हटवावेत आणि होणारी वाहतूक कोंडी थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
रेशन दुकानांमध्ये दरपत्रक दिसेना
अंबाजोगाई : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दर्शनी भागात अनेक दुकानदारांनी धान्याचे दरपत्रक लावलेले नाहीत. तसेच अनेक दुकानांमध्ये तक्रार पेटीदेखील ठेवण्यात आली नाही. त्यामुळे रेशन धान्याचा साठा व शासकीय किमती याची माहिती उपलब्ध होत नाही. रेशन दुकानदारांनी दरपत्रकाचा फलक लावावा, असा नियम असतानाही याकडे दुर्लक्ष केले आहे.