शिरूर कासार : येथील जाज्वल्य देवस्थान तथा पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कालिका देवीचा उत्सव रविवारी तिसऱ्यांदा पंचाच्या उपस्थितीत पार पडला. मंदिरातच पंचांनी पालखी प्रदक्षिणा घातली, तर एकच कावड, एकच प्रातिनिधीक स्वरूपात नैवेद्य समर्पित करण्यात आला.
येथे वर्षभरात दोनवेळा जुन्याची व नव्याची अमावास्या उत्सव साजरा होतो. अगदी पुणे, मुंबईसह बाहेरगावी असलेले हजारो भाविक आवर्जून देवीच्या या उत्सवाला व दर्शनाला हजर असतात. मात्र, तिसऱ्यांदा हा उत्सव मंदिरातच करावा लागला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच प्रतिबंध म्हणून निर्बंध असल्याने विश्वस्त मंडळांनी हा उत्सव नियमानुसार पार पाडला. मंदिर समितीचे अध्यक्ष रोहिदास पाटील, सचिव लक्ष्मणराव गाडेकर, उपाध्यक्ष गोविंद पाटील, दत्ता पाटील, वैभव गाडेकर, राजू गाडेकर, प्रमोद दगडे, अशोक भांडेकर, डॉ. रमणलाल बडजाते, मधुकर नगरकर व पुजारी महेंद्र भांडेकर यांच्या उपस्थितीत दीप अमावास्या सोहळा साजरा करण्यात आला.
घराघरांतून नैवेद्याला फाटा
शंभरावर भाविक कावडी घेऊन शनीचे राक्षसभुवन येथून गंगाजल आणतात. देवीची पालखी सिंदफणा तीरावर सवाद्य जात असते. रात्री ९ वाजेपर्यंत पूजा, महाआरती सोपस्कार झाल्यानंतर मंदिरात देवीचे आगमन होते. घराघरांतून पुरणपोळीचा नैवेय येत असतो. यंदा या सर्व बाबीला बाजूला सारून परंपरेला बाधा नको म्हणून मोजक्याच उपस्थितीत हा कुलाचार संपन्न झाला.
प्रातिनिधीक स्वरूपात एकच नैवेद्य
शशिकांत कापरे यांनी सर्वांचे प्रतिनिधित्व करत देवीला नव्या गव्हाच्या पुरणपोळीचा नैवेद्य समर्पित केला. दिवसभर भाविक मंदिराच्या पायरीचे दर्शन घेऊन जात होते. कोरोना नियमांचे पालन करतच हा कुलाचार भावनेला बाजूला ठेवून साजरा करावा लागला, असे मंदिर विश्वस्तचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी सांगितले.
===Photopath===
110421\img20210411181416_01_14.jpg~110421\img20210411181251_14.jpg