चौकशीसाठी गटविकास अधिकारी पाचेगावात
गेवराई : पीडितेला व्यभिचारी ठरवून गावातून हद्दपारीचा ठराव चार महिन्यांपूर्वी तीन ग्रामपंचायतींनी घेतला होता. हे प्रकरण सोमवारी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. यासंदर्भात गेवराईचे गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी मंगळवारी सकाळी पाचेगावला जाऊन चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. १५ ऑगस्ट २० रोजीच्या ग्रामसभेत असा ठराव घेतला असल्याची माहिती सानप यांनी दिली.
पाच वर्षांपूर्वी एका महिलेवर गावातीलच चार जणांनी अत्याचार केला होता. याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने यामधील चारही आरोपींना गतवर्षी जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. दरम्यान, या प्रकरणातील पीडित महिलेला चारित्र्यहीन व व्यभिचारी म्हणत सदरील महिलेविरोधात तीन ग्रामपंचायतींनी चक्क गावातून हद्दपार करण्याचा ठराव घेतला. एवढ्यावरच न थांबता ती चारित्र्यहीन व व्यभिचारी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, तिच्याविरोधात ॲट्राॅसिटीसारखा गंभीर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. हा संतापजनक प्रकार गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे समोर आला आहे. गावातील लोकांनी संगनमत करून या महिलेला गावातून हाकलून देण्याकरिता पाचेगाव, वसंतनगर तांडा व जयराम नाईक तांडा या ग्रामपंचायतींनी १५ ऑगस्ट २०२० रोजी ठराव घेऊन सदरील महिलेवर चारित्र्यहीन व व्यभिचारी असल्याचा आरोप करीत गावातून हद्दपारीचा संतापजनक ठराव घेतला.
दरम्यान, सोमवारी पाचेगाव येथील ग्रामस्थ, महिला यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन या महिलेविरोधात निवेदन दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. महिलेविरोधात घेण्यात आलेल्या ठरावावर ग्रामसेवक, सरपंचांची सही असल्याने हा विषय अतिशय गंभीर झाला आहे. ठराव करणाऱ्या या तीनही ग्रामपंचायतींच्या सरपंच महिला आहेत. सदरील महिलेपासून गावातील नागरिकांना धोका आहे, तिची वागणूक समाजमान्य नाही. तिने यापूर्वीदेखील अनेकांवर बलात्काराचे आरोप केले आहेत. नेहमीच विनयभंग, बलात्काराचे आरोप करून नागरिकांना धमक्या देत असल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. तरी या महिलेची कोणतीही फिर्याद गावात शहानिशा केल्याशिवाय घेऊ नये, असे निवेदन ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.