बीड : शहरातील मोमीनपुरा भागातील दोन गटांतील मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या व पोलीस कोठडीत असलेल्या महंमद इम्रान महंमद रफीक (४१,रा. मक्का चौक, मोमीनपुरा) या कापड व्यापाऱ्याची प्रकृती अचानक बिघडली. सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात व नंतर औरंगाबादला खासगी दवाखान्यात हलविल्यानंतर उपचारादरम्यान २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
मयत महंमद इम्रान यांचे मोमीनपुरा भागात कापड दुकान आहे.
जागेच्या किरायावरून शहरातील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घडली. चाकू, रॉड व लाकडी दांड्यांचा हाणामारीत सर्रास वापर करण्यात आला. परस्परविरोधी तक्रारींवरून १८ जणांवर पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात एका गटाच्या तिघांना तर दुसऱ्या गटाच्या एकास २३ सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यात मयत महंमद इम्रान याचा समावेश होता. दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता पेठ बीड पोलिसांनी तपासकामी त्या सर्वांना कोठडीतून बाहेर काढले. मात्र, महंमद इम्रान यास उलट्या होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबादेतील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याची २६ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता प्राणज्योत मालवली. महंमद इम्रान महंमद रफीक यांच्या तक्रारीवरून, ९ जणांवर गुन्हा नोंद झालेला आहे. मोमीन सईद मोमन जहीर, मोमीन फसियोद्दीन मोमीन रियाजोद्दीन, मोमीन फइमोद्दीन महंमद शरीफ, मोमीन महंमद जहर महंमद शरीक, मोमीन फदिरोद्दीन मोमीन फयिदोद्दीन, मोमीन आमेर मोमीन फइदोद्दीन, मोमीन समीर मोमीन जहिरोद्दीन, मोमीन अझहर मोमीन फइमोद्दीन, मोमीन राजा अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद आहे.
....
शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
दरम्यान, आरोपीचा कोठडीत मृत्यू झाल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) दिला जातो. महंमद इम्रान यांची औरंगाबादेत न्याय दंडाधिकाऱ्यांसमक्ष उत्तरीय तपासणी केली जाणार असून त्यानंतर दफन विधीसाठी मृतदेह नातेवाइकांकडे दिला जाणार आहे. उत्तरीय तपासणी अहवाल येणे बाकी आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल, असे उपअधीक्षक संतोष वाळके यांनी सांगितले.
.....
250921\25bed_25_25092021_14.jpg
महंमद इम्रान