अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान तथा अंबाजोगाईचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव २१ ते २९ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना श्री योगेश्वरी देवीचे दर्शन ७० फूट अंतरावरून घ्यावे लागत असल्याने देवीचा तांदळा भाविकांना स्पष्ट दिसत नाही. परिणामी दूरून येऊनही मूर्तीही स्पष्ट दिसत नसल्याने भाविकांना दर्शनाचे समाधान होईना. किमान ३५ फूट अंतरावरून तरी दर्शनाची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी प्रवेश नाकारला आहे. सध्या भाविकांना कुंडापासून दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. कुंडापासून ते योगेश्वरीच्या देवीच्या तांदळ्यापर्यंतचे (मूर्ती) अंतर किमान ७० फुटांचे आहे. इतक्या लांब अंतरावरून दर्शनाची सोय केली आहे. हे अंतर वृद्ध महिला, भाविक यांच्यासाठी मोठे होऊ लागले आहे. मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव व योगेश्वरी देवीचे दर्शन हे समीकरणच भाविकांमध्ये जुळलेले आहे. अशा स्थितीत इतक्या दूरून होणाऱ्या दर्शनामुळे समाधान लाभत नसल्याचे भाविक सांगतात.
हे अंतर तांदळ्यापासून किमान ३५ फुटांचे ठेवावे. श्री योगेश्वरी देवीच्या मंदिराला गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत. बाजूच्या दोन्ही दरवाजांमधून भाविकांना सोडण्यात यावे व कासवापासून दर्शनाची सुविधा उपलब्ध करावी. ३५ फूट अंतरावरून देवीचे दर्शन चांगले होईल व भाविकांना याचे मोठे समाधानही मिळेल. दसरा व नवरात्र महोत्सवात भाविकांना मंदिर बंद असल्याने दर्शन घेता आले नाही. आता या मार्गशीर्ष महोत्सवात भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यांची दूरून दर्शनाची होणारी गैरसोय दूर करावी व जवळून दर्शन मिळावे, अशी अपेक्षा भाविकांना आहे.