परळी ( बीड ) : येथील रेल्वे स्टेशनवर नांदेड- बंगळुरू एक्सप्रेस रेल्वे मधील कोच क्रमांक एस 2 रेल्वे डब्यात सीटवर दीड महिन्याचे मुल सोडून अज्ञात महिला पसार झाली आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी निदर्शनास आला . लहान बाळाला नागरिकांच्या सहाय्याने परळी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ,हा मुलगा असल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान रेल्वे स्टेशन मास्तर परळी यांनी परळी रेल्वे पोलिसांना नांदेड- बंगळुरू एक्सप्रेस रेल्वे डब्यात दीड महिन्याचे बाळ आढळून आले असल्याची खबर कळविले. यावरून हे बाळ रेल्वे महिला पोलिस हेमलता नागपुरे व इतर कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात हलविले आले आहे .या प्रकरणी परळी रेल्वे पोलीस जमादार अनंत कांबळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दीड महिन्याचे पुरुष जातीचे बाळ अज्ञात मातेने या बाळाचा सांभाळ व पालन-पोषण न करण्याच्या उद्देशाने नांदेड- बंगळुरू एक्सप्रेस एक्सप्रेस गाडी सोडून देऊन निघून गेली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास परळी रेल्वे पोलिस ठाण्याचे एपीआय सोगे हे करीत आहेत.