बाजारात जनावरांची आवक वाढली
नेकनूर : येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. या पंचक्रोशीतील जनावरे याठिकाणी विक्रीसाठी येतात. कारखाना सुरू होण्यापूर्वी बाजार सुरू करण्यास बंदी होती. त्यामुळे धंदा कोलमडला होता. दरम्यान, बंदी उठल्यानंतर बाजार पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे बाजारात जनावरे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दाखल होत आहेत.
वीज तारांवर आकडे टाकून वीजचोरी वाढली
बीड : तालुक्यातील जेबापिंप्री, चांदेगाव, सात्रा या गावांमध्ये विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. याचा मनस्ताप मीटरधारकांना होत असून, आकडे टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मीटरधारकांनी केली आहे; परंतु महावितरणकडून अद्याप पावले उचलली जात नाहीत.
नेकनूर ते नांदूर रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील नेकनूर ते केज तालुक्यातील नांदूर या १६ किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. नेकनूर व नांदूर ही दोन्ही गावे आठवडी बाजाराची असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. वेळोवेळी रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही याकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत आहे. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.