अवैध वाळू उपशात वाढ
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी होत आहे.
बाजारातील कोंडी दिवसेंदिवस वाढतेय
बीड : शहरातील भाजी मंडईत प्रत्येक रविवारी आठवडे बाजार भरतो ; परंतु येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
स्थानकात अस्वच्छता ; स्वच्छतेची मागणी
अंबाजोगाई : येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकाच्या परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही बसस्थानकात मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
लघु व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न गंभीर
केज : शहरात रस्त्याच्या दुतर्फा बसून लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला ज्यांच्या मालकीच्या जागा आहेत, त्यांच्या मर्जीनुसार भाडे देऊन जागा किरायाने घ्यावी लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कामासाठी रस्त्याचे खोदकाम केल्याने अनेकांवर त्यांचे व्यवसाय जागेअभावी बंद करण्याची वेळ आली आहे.
व्यवसायासाठी नियमांची मोडतोड
बीड : हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मध्यभागी दुभाजक तोडले आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गाजर गवताच्या वेढ्याने अस्वच्छता
अंबाजोगाई : शहरातील शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्ती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्वच्छतेकडे अद्यापही दुर्लक्ष केले जात आहे. ही स्वच्छतेची समस्या मार्गी लावली जात नाही. स्वच्छता करून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
प्लास्टिक बंदीला खो ; कारवाईची मागणी
बीड : प्लास्टिक वापरासाठी बंदी असतानाही अंबाजोगाई शहर व परिसरात अजूनही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांमध्ये विविध वस्तू दिल्या जातात. भाजी मार्केटमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. नगरपरिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.