गेवराई : सध्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अनेकांना आर्थिक अडचणींसह मंदीला तोंड द्यावे लागत आहेत. त्यामुळे संसार चालवण्यासाठी छोटे मोठे व्यवसाय सुरू करणारे व्यावसायिक आपला पूर्वीचा व्यवसाय सोडून नवीन व्यवसाय मोठ्या उभारीने सुरू करत असल्याचे चित्र सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरात पाहायला मिळत आहे.
सध्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच ठिकाणचे व्यवसाय हे थोड्या फार प्रमाणात चालताना दिसत आहेत. तर कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल अडीच महिने सर्व व्यापारी पेठा बंद होत्या. त्यानंतर व्यापारी पेठा सुरळीत सुरू झाल्या. मात्र पुरेसा व्यवसाय होत नसल्याने अनेक दुकान मालकांनी दुकानातील कामगार कमी केले आहेत. त्यामुळे कमी झालेले कामगार काय करावे याच विचारात होते. त्यात काही कामगारांनी स्वत:च्या हातगाड्यावर भाजीपाला, फळविक्री,चहाची दुकाने सुरू केली आहेत. कोराेनामुळे बदललेल्या परिस्थितीत व्यवसायामुळे अनेकांनी नवीन व्यवसाय तसेच जोडधंदे सुरू केल्याचे चित्र शहरात व ग्रामीण भागात दिसत आहे.
( चौकट )
आमचा भोजनालयाचा व्यवसाय आहे. त्याला जोड धंदा म्हणून दुकानासमोर फळविक्रीचे दुकान सुरू केले. यातून साधारण कमाई होत असल्याचे येथील नवीन व्यापारी विलास मस्के यांनी सांगितले.
( चौकट )
मी शहरातील एका सुवर्णकाराच्या दुकानात कामाला होतो. मात्र मार्चअखेर लाॅकडाऊन लागल्याने मला कमी करण्यात आले. त्यामुळे मी न खचता स्वत:चा भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यातून मला चांगले उत्पन्न मिळत असल्याचे भाजीविक्रेते दादाराव डहाळे यांनी सांगितले.