बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला आहे. औरंगाबाद व इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला तो बीडला नाही हे दुर्दैव आहे. हे सर्व म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बॅक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना ३ मार्च रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्हा बॅकेची निवडणूक घेण्याची जबाबदारी शासनाच्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची आहे. परंतु, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ नये, यासाठी उमेदवारांनी भरलेले अर्ज बाद करणे तसेच संचालक मंडळाची रचना निवडणुकीनंतर पूर्ण होत नसल्यामुळे बँकेवर प्रशासक व नंतर प्रशासकीय मंडळ नेमणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक यांच्यावर राजकीय दबाव टाकून निवडणूक रद्द करण्याचा डाव आखत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज छाननी वेळी कोणाचेही आक्षेप नसताना स्वतः होऊन उपविधी क्र. उदा. (अ)(५) यास निकाल लागेपर्यंत स्थगिती असतानादेखील सदर स्थगिती सर्वोच्च न्यायालयाच्या फौजदारी प्रक्रियेतील प्रकरणाचा हवाला देऊन स्थगितीची कालमर्यादा या नावाखाली ७५ टक्के उमेदवारी अर्ज नामंजूर केलेले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत मनमानी करून पदाचा दुरुपयोग केला आहे. छाननीच्या वेळी काही अपात्र उमेदवारांचे अर्जही त्यांनी मंजूर केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वा. अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे तसेच निवडणुकीस आक्षेपावर खुलासा करण्यासाठी वेळही दिला नाही, हे सर्व गैरप्रकार बॅकेच्या निवडणूक प्रक्रियेत झाले आहेत. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा यांचा समावेश होता.
===Photopath===
040321\04bed_1_04032021_14.jpg
===Caption===
पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा यांचा समावेश होता.