यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्याचे पापदेखील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचेच आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसींची आकडेवारी केंद्रातील भाजप सरकारकडे मागितली होती; परंतु त्यांनी ती दिली नाही, त्यामुळेच ओबीसींचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. याचा आजच्या आंदोलनात विरोध दर्शविण्यात येत आहे. गत दीड वर्षापासून देश कोरोना महामारीचा सामना करीत आहे. या काळात शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. आज उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो लोक बेरोजगार होऊन देशोधडीला लागले आहेत. भाजपाच्या दिशाहीन नेतृत्वामुळे देश एका अभूतपूर्व संकटाचा सामना करीत आहे. ओबीसींच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
अॅड. विष्णुपंत सोळंके यांनी उपस्थितांना ‘संविधान रक्षणाची शपथ’ दिली. अंबाजोगाई येथे झालेल्या जनआंदोलनात बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, अॅड. विष्णुपंत सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक वाजेद खतीब, नगरसेवक सुनील व्यवहारे, नगरसेवक धम्मपाल सरवदे, राणा चव्हाण, सुनील वाघाळकर, गणेश मसने, सज्जन गाठाळ, शेख मुख्तार आदींसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.