लाेकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील बसस्थानकाची सध्या केवळ नियोजनाचा अभाव असल्याने वाईट अवस्था झाली आहे. सर्वत्र अस्वच्छता, रस्ते उखडलेले आहेत. त्यामुळे धुळीचा सामना करावा लागत आहे. स्थानक व आगाराच्या इमारतीचे काम नव्याने हाती घेण्यात आल्याने आहे त्या समस्या दूर करण्यासाठी निधी मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्या प्रवाशांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बीड बसस्थानकात दररोज जवळपास ४०० पेक्षा जास्त बसेसची ये-जा असते. तसेच जवळपास ६ हजारांपेक्षा जास्त प्रवासी येतात. जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानकही बीडचेच आहे. परंतु अपुरी जागा आणि वाढत्या समस्यांमुळे येथे प्रवाशांना कायम त्रास सहन करावा लागला आहे. बसस्थानकात प्रवेश करताच खड्ड्यांचा सामना करावा लागतो. गुडघ्याएवढे खड्डे पावसाळ्यात पडतात. यात बसेस आदळल्याने प्रवाशांना त्रास होतो, शिवाय बसेसचे नुकसान होत आहे. रापमच्या स्थापत्य विभागाने यापूर्वी अनेकदा हे खड्डे थातूरमातूर बुजवून कंत्राटदार पोसण्याचे काम केलेले आहे. याबाबत तक्रारीही झालेल्या आहेत.
दरम्यान, स्थानकात आल्यावर शौचालये स्वच्छ असायला हवीत. आतमध्ये खाजगी वाहनांचा वावर, मोकाट गुरांचा वावर असू नये. प्रवाशांना पाणी, स्वच्छता, बसण्याची व्यवस्था जरी चांगली केली तरी समाधानाची बाब आहे. आगार प्रमुख, स्थानक प्रमुख यांनी नियोजनासाठी परिश्रम घेण्याची गरज आहे.
शौचालयेही अस्वच्छ, कोरोनामुळे प्रवासी जाईनात
बीड बसस्थानकात प्रवासी, कर्मचाऱ्यांसाठी शौचालये, मुतारीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु हेही सद्यस्थितीत अस्वच्छ असल्याचे दिसत आहे.
तसेच सध्या कोरोनाच्या भितीमुळे प्रवासीही सार्वजनिक शौचालयात जाण्यास धजत नसल्याचे दिसते.
बसस्थानकात सर्वत्र अस्वच्छता असते. अस्ताव्यस्त वाहनांची पार्किंग आणि बसेसही कशापण उभा केल्या जात असल्याने प्रवाशांना मार्ग शोधताना कसरत करावी लागते.
प्रवाशांचे हाल होणार नाहीत, त्यांना किमान आवश्यक सुविधा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
लॉकडाऊनमुळे कामाला अडथळा
बसस्थानक, आगाराच्या इमारतीचे काम मंजूर झालेले आहे. या कामाला सुरूवातही झाली होती. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि हे काम थांबले.
आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने हे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. गतीने काम करण्याची मागणी होत आहे.
बीडच्या बसस्थानकापेक्षा जनावरांच्या गोठ्यात जास्त स्वच्छता असते. येथे ना बसायला जागा आहे ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. आदळे बसायला सुरुवात झाली की बीड स्थानकात प्रवेश केला याची जाणीव होते. यात सुधारणा करण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी मूलभूत सुविधा तरी द्याव्यात.
- मनोज आहिरे, प्रवासी, उस्मानाबाद
सध्या सर्वत्र कोरोनाची भीती आहे. येथील शौचालये कधीच स्वच्छ नसतात. महिलांसाठी विशेष व्यवस्था नाही. हिरकणी कक्ष बंद आहे. येथे आले की असुरक्षित वाटते. लहान मुले, वृद्ध, महिलांना जीव मुठीत धरून बसावे लागते. जागा कमी असल्याने काही पुरूष धक्के देतात. याचा खूप त्रास होतो.
- मंगल सोजवळ, प्रवासी बीड
सध्या बसस्थानक, आगाराचे काम नव्याने करण्यास सुरुवात केली आहे. जुन्या स्थानकात थोड्याफार समस्या आहेत. परंतु नवीन इमारत होत असल्याने याच्या दुरूस्तीसाठी निधी मिळत नाही. तरीही प्रवाशांचे हाल होणार नाहीत, यासाठी काळजी घेतली जात आहे. नव्या इमारतीचे काम गतीने सुरू आहे.
- निलेश पवार, आगारप्रमुख, बीड