धारूर : राज्यातील १ ली ८ वी च्या विद्यार्थांना शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शालेय पोषण आहार कामगार संघटना सीटूचे शिष्टमंडळ ११ जानेवारी रोजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना भेटणार असल्याची माहिती राज्य सचिव डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
राज्यातील १ ली ८ वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणाऱ्या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शालेय पोषण आहार कामगारांना १५०० रुपये महिना मानधन दिले जाते. त्यांना ५० रुपये रोज पडतो. महिन्याकाठी त्यांना १५०० रुपये मिळतात. या १५०० रुपयांमध्ये महिन्याचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न महिला कामगारांना पडला आहे. महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील शालेय पोषण आहार कामगारांप्रमाणे मानधन देण्याची संघटनेची मागणी आहे.
इतर राज्यांप्रमाणे शालेय पोषण आहार कामगारांना मानधन द्यावे, आयकर लागू नसलेल्या शालेय पोषण आहार कामगारांना ७ हजार ५०० रुपये महिना द्यावा, ६० वर्षे वयापुढील कामगारांना पेन्शन लागू करावे, त्यांना शासकीय सेवेत कायम करावे यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड , सीटूचे सरचिटणीस कॉ. ॲड. एम. एच. शेख यांच्या अध्यक्षखाली व शालेय पोषण आहार फेडरेशनचे राज्याध्यक्ष कॉ. प्रभाकर नागरगोजे , कॉ. प्रा. ए. बी. पाटील , कॉ. मधुकर मोकळे , कॉ. डॉ. अशोक थोरात, कॉ. कल्पना शिंदे , कॉ. मीरा शिंदे , कॉ. पंजाबराव गायकवाड , कॉ. सुभाष पांडे , कॉ. मंगल ठोंबरे , कॉ. नितीन देशमुख , कॉ. अनिल मिसाळ ,कॉ .अमोल नाईक , कॉ. मनसुर कोतवाल , कॉ. अनिल कराळे , कॉ. तानाजी वाघमारे , कॉ. शरद पाटील , कॉ. देशकर , सुरेश गायकवाड , नजामिन पिंजारी , किरण बच्छाव आदी राज्य पदाधिकारी शिक्षणमंत्र्यांना भेटणार आहेत.
------------
शेकडा ते हजाराचा फरक
तामिळनाडूमध्ये ११००० रुपये , केरळमध्ये ३६० रुपये रोज दिला जातो म्हणजे १०,८०० रूपये महिना , सिक्कीम मध्ये ७००० रुपये , हरियाणा ३५०० , तेलंगणा ३००० रुपये , आंध्र प्रदेश ३००० रुपये , पंजाब ३००० रुपये , कर्नाटक २७०० रुपये , मध्ये प्रदेश २००० रुपये , राज्यस्थान १८०० रूपये आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये १५०० रूपये महिना दिला जातो. या तुलनेत महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार कामगारांना कमी मानधन मिळत आहे.