बीड : राज्यातील कोरोना संसर्ग वाढत आहे. दरम्यान ११ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या निमित्त विविध ठिकाणी उत्सव यात्रांचे आयोजन दरवर्षी केले जाते. मात्र, लोकांची गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असल्यामुळे जिल्ह्यातील शिवालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गर्दी होऊन संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व शिवालये ११ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या निमित्त असणाऱ्या दर्शनासाठी बंद राहणार आहेत. तर, परळी येथील प्रभू वैद्यनाथ दर्शन व यात्रा रद्द करण्यात आली असून, ८ मार्च ते १६ मार्च दरम्यान प्रभू वैद्यनाथ मंदिर देखील बंद राहणार आहे. दरम्यान कोरोनाचे नियम पाळून महाशिवरात्रीच्या निमित्त प्रथेप्रमाणे पूजा व इतर विधी केले जातील. असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नियमांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. भंग केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.