बीड : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवर अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने रुस्तुम बाळाजी मते (रा.गंगावाडी, ता.गेवराई ) या शेतकऱ्याला चिरडल्याची घटना ४ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एवढी मोठी घटना घडूनदेखील पोलिसांकडून टिप्पर चालकाचा शोध घेण्यास असमर्थता दाखवीत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात गोदावरी व इतर नदीपात्रातून पोलीस व महसूलच्या आशीर्वादाने राजरोस अवैधरीत्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. याला संबंधित ग्रामस्थांकडून वेळोवेळी विरोधदेखील झाला आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या दंडेलशाहीपुढे गावकऱ्यांचे काहीच चालत नव्हते. भरधाव वेगात वाळू वाहतूक केल्यामुळे परिसरातील गावांमधील रस्त्याचे व शेतीचे मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी वेळोवेळी केल्या होत्या. मात्र, त्याकडे महसूल व पोलीस प्रशासनाने ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले. ४ जानेवारी रोजी मते यांना चिरडल्यानंतर लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह गावकऱ्यांनी ताब्यात घेतला नव्हता. मात्र, त्यानंतरदेखील कोणतीच योग्य ती कारवाई केली नसल्याचा आरोप गावकऱ्यांमधून केला जात आहे. ५ जानेवारी रोजी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ते टिप्पर एका पोलीस कर्मचाऱ्याचे असल्याची सर्वत्र चर्चा होती. त्यामुळे नेमके टिप्पर कोणाचे, हा प्रश्न कायम आहे. घटना घडून दोन दिवस उलटले तरीदेखील अद्याप एकाही टिप्पर चालकास ताब्यात घेतले नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे.
तलाठी, बीट अंमलदार, मंडळ अधिकाऱ्याचे होणार निलंबन
संबंधित गावातील तलाठी, बीट अंमलदार व मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंदर्भात तहसीलदारांकडून अहवाल मागविल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिली.