बीड : एका भूसंपादन मावेजाप्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला कैद करण्याचा आदेश बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस. एस. पिंगळे यांच्या न्यायालयाने दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यात भूसंपादनाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वी माजलगावच्या न्यायालयाने मावेजाप्रकरणी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची कार जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच बीडच्या दिवाणी न्यायालयाने आणखी एक आदेश दिला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
बीड येथील राजेश पोकळे यांची जमीन लघु पाटबंधारे विभागाने ( स्थानिक स्तर) प्रकल्पासाठी संपादित केली होती. त्याचा मावेजा देण्याचा आदेश २०१८ मध्ये देण्यात आला होता. मात्र त्याची पूर्तता अद्यापही झाली नाही. त्यामुळे १३ लाख १९ हजार रुपयांच्या मावेजासाठी शासनाच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता यांना कैद करावे तसेच त्यांच्याकडून मावेजाची रक्कम भरणा करुन घ्यावी, अशा आदेशाचे वॉरंट बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस. पिंगळे यांच्या न्यायालयाने काढले आहेत. या वॉरंटची अंमलबजावणी २१ मार्चपूर्वी करावयाची आहे.