कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय प्रशासन करत असताना, जीवनावश्यक वस्तू किराणा, भाजीपाला हे सर्व पाच दिवस सुरू ठेवल्यावर शनिवार व रविवार हे दोन दिवस कडक लॉकडाऊन करून फक्त अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू करण्याच्या निर्णयामुळे शनिवारी लॉकडाऊनची अंमलबजावणी शहरात काटेकोरपणे दिसून आली. सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. या काळात एसटी महामंडळाच्या बसेस मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. धारूर बसस्थानकावर नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील फेऱ्या असणाऱ्या बसेस सकाळपासूनच वाहक व चालकांनी उभ्या केल्या व ते प्रवाशांची वाट पाहत थांबले. मात्र बस स्थानकाकडे एक ते दोन प्रवासी सोडता कोणीही फिरकले नाही. आगारप्रमुख शंकर स्वामी यांच्याकडे चौकशी केली असता, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळ सज्ज होते; मात्र पुरेसे प्रवासी न फिरकल्याने ही वाहतूक रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.
बीड-धारूर बसचे उत्पन्न अवघे २०० रुपये
बीडहून येणाऱ्या एका मुक्कामी बसमधून फक्त दोनशे रुपये उत्पन्न झाले. या बसमध्ये सात प्रवासी होते, तर अंबाजोगाई, केज, बीड व ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस बसस्थानकावर आणून उभ्या केल्या होत्या. स्थानकात आठ ते नऊ बसेस या रांगेत प्रवाशांची प्रतीक्षा करीत असताना, एकही प्रवासी मात्र याकडे फिरकला नाही. बसस्थानकाचे नियंत्रक यांना विचारले असता, वरिष्ठांचा आदेश येताच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र प्रवासी न फिरकल्याने शेवटी दुपारनंतर या सर्व बसेस आगारात नेण्यात आल्या.