सतीश जोशी
बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री पंकजा मुंडे या बहीण - भावातील राजकीय शक्तिप्रदर्शन पाहायला मिळेल, असे वाटले होते. परंतु पंकजा मुंडेंनी ऐनवेळी निवडणुकीवर बहिष्कार टाकत राजकीय स्पर्धेतील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केला. मतदानाच्या पूर्वसंध्येला बहिष्काराची खेळी खेळत राजकीय वर्चस्वाबाबत झाकली मूठ सव्वालाखाची करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ५८ टक्के मतदारांनी पंकजांचा बहिष्काराचा हा आदेश झुगारून मतदान केले, इथेच त्यांचा पहिला पराभव झाला होता. झालेल्या मतदानापैकी ५२ टक्क्यांपेक्षाही अधिक मतांनी महाविकास आघाडीचे आठपैकी पाच उमेदवार निवडून आल्याने या निवडणुकीत पालकमंत्री धनंजय मुंडेंचेच वर्चस्व होते, हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे. भाजप, शिवसेनेचा प्रत्येकी एक, तर एक अपक्ष निवडून आला.
१९ पैकी ८ जागांसाठी होणाऱ्या मतदानाला तसे फारसे महत्त्व नसले तरी उर्वरित जागा चांगल्या मताधिक्क्याने निवडून आणून विरोधकांनी कसा रडीचा डाव खेळला, हे ठासून पंकजांना जगाला सांगता आले असते. या बँकेच्या १९ जागांसाठी निवडणूक लागली होती. सेवा सोसायटी मतदारसंघातील ११ जागांसाठी दाखल केलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज फेटाळल्याने उर्वरित आठ जागांसाठी मतदान होणार होते. या आठ जागांमुळे गणपूर्तीची अट पूर्ण होणार नसल्याने तसे या निवडणुकीला फारसे महत्त्व उरले नसले तरी बँकेवर कुणाचे वर्चस्व आहे, मतदार कुणाच्या बाजूने आहेत, हे दाखविण्याची संधी पंकजा मुंडे आणि भाजपला होती. पंकजा यांच्या मते पालकमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खरेच रडीचा डाव खेळला असता तर महाविकास आघाडीला इतकी मते पडली नसती. १३८२ मतदान असलेल्या या बँकेवर आमचे वर्चस्व आहे, चांगला कारभार करून बँक तोट्यातून नफ्यात आणली, विरोधकांनी बँक तोट्यात आणली, असे पंकजा वारंवार सांगत होत्या. परंतु, मतदारांनी त्यांच्या या आरोपांकडे साफ दुर्लक्ष करून धनंजय मुंडेंवर विश्वास दाखवला. ज्या मतदानातून काहीच निष्पन्न होत नाही, प्रशासक येणार हे दिसत असताना राजकीय शक्तीची परीक्षा कशाला करायची, असे कदाचित पंकजा यांना वाटले असावे, म्हणून पंकजांनी बहिष्काराची खेळी खेळली होती. याउलट पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व ताकदीने निवडणुकीत उतरून त्यांनी विजयासाठी तशी ‘फिल्डिंग’ही लावली होती. गेलेली सत्ता आपण कशी सहज आणू शकतो, हे धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या वेळी पंकजा यांना दाखवून दिले होते.
मागच्या बँकेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपची राज्यात सत्ता होती. जिल्ह्यातील सर्वच आमदार बाजूने होते. त्यामुळे पंकजा यांच्या ताब्यात एकतर्फी बँक आली. यावेळी सत्ता नव्हती आणि मागच्यासारखा नेतेमंडळीतील एकसंघपणाही नव्हता.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अपक्ष म्हणून एकतर्फी निवडणूक जिंकली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रकाश सोळंके यांचा विरोध होता. मोदींनी महाविकास आघाडीतील गटबाजीचा फायदा उचलत आ. सोळंके यांच्याच उमेदवाराचा पराभव केला. पालकमंत्री धनंजय मुंडेंचे मुरब्बी राजकारण दिवसेंदिवस फुलत आहे. पंकजा मुंडे यांच्या ताब्यातून त्यांनी सर्वप्रथम बीड जिल्हा परिषद ताब्यात घेतली आणि आता बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्चस्व मिळवले आहे.
===Photopath===
200321\0906202_bed_22_20032021_14.jpg~200321\0906202_bed_21_20032021_14.jpg
===Caption===
पंकजा मुंडे~धनंजय मुंडे