बीड : भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळात ओबीसी समाजाची सर्व प्रकारे उपेक्षा होत असताना, हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून बघ्याची भूमिका बजावणाऱ्या भाजपच्या ओबीसी नेत्यांना आता ओबीसींबद्दल आंदोलन करण्याचा मुळीच नैतिक अधिकार नसल्याची टीका सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केली आहे.
सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा भाजपकडून आरोप करण्यात येत आहे. हे म्हणजे ‘उलट्या बोंबा’ यातला प्रकार असल्याचे आखाडे म्हणाले. भाजपच्या पाच वर्षाच्या राजवटीत २०१७ मध्येच ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल झालेली होती. तेव्हा गप्प बसण्याची भूमिका घेतलेल्या नेत्यांना आता ओबीसी आरक्षणासंदर्भात मोर्चे काढण्याचा अधिकार आहे का असा सवालदेखील आखाडे यांनी केला.
भाजपकडून ओबीसी आरक्षणाचा स्टंट : हिंगे
भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात केलेले आंदोलन म्हणजे राजकीय स्टंट असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आवाज उठवला होता. तेच सातत्याने ओबीसी आणि मायक्रो ओबीसींच्या प्रश्नावर लढा देत आहेत. तर, मंडल आयोगाला विरोध करणारे हेच भाजपचे नेते होते त्यामुळे हा राजकीय स्टंट असून, समाज यांना भुलणार नाही असे हिंगे म्हणाले.