अविनाश कदम/
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. २९ जून रोजी आलेल्या ६४ तर ३० जून रोजी ५२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या दोन दिवसांमध्ये ११६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ३० रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. यामुळे आष्टीकरांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
आष्टी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. या अँटिजन टेस्टमध्ये अनेक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या आष्टी तालुक्यात झपाट्याने वाढली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
आष्टी तालुक्यात कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासन आरोग्य विभागाच्या मदतीने काम करीत आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे. कोरोनाचे लक्षण आढळून आले तर तत्काळ रुग्णालयात जाऊन अँटिजन टेस्ट करून घ्यावी. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर त्यांनी कोंविड सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार घ्यावा, असे आवाहन प्रभारी तहसीलदार प्रदीप पाडुळे यांनी केले आहे.
....
आष्टी तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवकांनी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घ्यावी. त्यांनी गावात खबरदारी घेऊन कोरोना पेशंट आढळून आल्यानंतर त्यांना तत्काळ कोविड सेंटर व विलगीकरण सेंटरमध्ये दाखल करावे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालय गावी थांबावे. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची खबरदारी घ्यावी. अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
-सुधाकर मुंडे, गटविकास अधिकारी, आष्टी.
...
आष्टी शहरासह तालुक्यातील सर्व नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. विनाकारण प्रवास टाळावा. कोरोनाचे लक्षणे जाणवल्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात टेस्ट करून घ्यावी. सध्या ग्रामीण रुग्णालयात एकूण १२० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ३० रुग्ण ऑक्सिजन बेंडवर उपचार घेत आहेत.
- राहुल टेकाडे, वैद्यकीय अधीक्षक (ग्रामीण), आष्टी.