गेवराई : सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करणे, ही सर्वश्रेष्ठ सेवा असल्याचे प्रतिपादन आदर्श शिक्षक गणपत पाबळे यांनी केले. त्यांच्या हस्ते तालुक्यातील टाकळगव्हाण येथे सैन्य दलात भरती झालेल्या जवानाचा ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी दिनेश गुळवे, उपसरपंच बाबासाहेब साठे, संभाजी शेळके, किरण माने, गणेश शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
टाकळगव्हाण येथील अवघ्या १९ वर्षाचा युवक अशोक सखाराम ठेंगल हा भारतीय सैन्य दलात भरती झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्याची गावामध्ये सवाद्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.
यावेळी गणपतराव पाबळे म्हणाले, अशोकने अभ्यास व सरावामध्ये सातत्य ठेवल्याने त्याची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. त्याचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा. अशोक हा बिकट नैसर्गिक परिस्थितीत देशसेवा करणार आहे, ही देशसेवा सर्वश्रेष्ठ सेवा असल्याचेही यावेळी पाबळे म्हणाले. यावेळी बाबासाहेब साठे म्हणाले,अशोकचा पूर्ण ग्रामस्थांना अभिमान आहे. या कार्यक्रमास शिवाजी ठेंगल, संतोष ठोंबरे, माऊली माने, अशोक जोडणार, गणेश माने, गोरक्ष माने, शरद ठोंबरे, बाबूराव माने, लखन माने, प्रविन माने यांच्यासह ग्रामस्थ, महिलांची उपस्थिती होती. सत्कारामुळे प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी अशोक ठेंगल याने व्यक्त केली. सूत्रसंचालन शिक्षक माने यांनी केले.