खरीप हंगामातील पिके काढणीच्या सुमारास अतिवृष्टी झाल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली होती. परंतु, रबी हंगाम हा सध्यातरी शेतकऱ्यांसाठी फायद्याचा दिसत आहे. गेल्या एक - दीड महिन्यांपूर्वी सतत ढगाळ वातावरण असल्याने रबी हंगामातील पिकांवर काही प्रमाणात चिकटा, लष्करी अळीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये बदल झाला असून थंडी कमालीची वाढली आहे. त्याचबरोबर आकाश निरभ्र राहत असून ऊनही पडत आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला असून पिके चांगल्या स्थितीत आहेत. वाढलेली थंडी ही गहू, हरभरा, कांदा आणि इतर पिकांसाठी लाभदायक ठरत आहे. यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी ज्वारी ४६ हजार ८७ हेक्टर, गहू ६ हजार ४३० हे. हरभरा १६ हजार १९७ तर कांदा पिकाची २ हजार ७५० हेक्टवर लागवड केली आहे. सध्या रबी हंगामातील पिकांसाठी लाभदायक वातावरण असल्याने शेतकरी आनंदी आहे.
रबी हंगामातील पीक पेरा
आष्टी ९ हजार ९२५, टाकळसिंग ८ हजार ६००, कडा ११ हजार ७१, धानोरा ९ हजार १२८, पिंपळा ९ हजार ४१, दौलावडगाव ८ हजार ९९१, धामणगाव १२ हजार १०० अशा एकूण ८६ हजार ८५६ हेक्टरवर रबी हंगामातील पिकांची लागवड करण्यात आली. तालुक्यात रबी/ उन्हाळा कांद्याची २ हजार ७८५ हेक्टवर लागवड केली आहे.
रबी पिकांसाठी वातावरण चांगले
वातावरणात चांगलाच गारठा वाढला आहे. त्याचबरोबर दिवसभर चांगले ऊन पडत आहे. त्यामुळे सध्याचे वातावरण हे सर्वच पिकांना चांगले आहे. असेच वातावरण पिकांची काढणी होईपर्यंत राहिले पाहिजे. गेल्या हंगामात अतिपावसामुळे वाया गेलेल्या पिकांची काही प्रमाणात भरपाई होईल.
राम नागरगोजे, शेतकरी