- अनिल महाजनधारुर ( बीड) : वाण नदीच्या पुरात आवरगाव येथे ऑटोसह वाहून गेलेला धारूर येथील चालकाचा मृतदेह अखेर तीन दिवसानंतर आढळून आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विशेष बचाव व सुरक्षा पथक व धारूर अग्निशामक दल यांना चालक अनिल बाबुराव लोखंडे यांचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. घटनास्थळापासून साधारणत: अर्धा किलोमीटर अंतरावर नदीपात्राच्या बाजूस झाडीमध्ये अडकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आज, शनिवारी (दि. 30) सकाळी आढळून आला.
धारूर तालुक्यात बुधवारी (दि. २७) रात्री अतिवृष्टीमुळे वाण नदीला पूर येऊन धारूर-आसरडोह आणि धारूर-आडस मार्गावरील दोन पूल पाण्याखाली गेले. या दोन्ही ठिकाणी पुराच्या पाण्याच्या अंदाज न आल्याने चारचाकी आणि रिक्षासह चालक वाहून गेले होते. दुसऱ्या दिवशी अंजनडोह येथे वाहून गेलेले आडत व्यापारी नितिन शिवाजीराव कांबळे (वय ४२) यांचा मृतदेह आढळून आला. मात्र, आवरगाव येथे वाहून गेलेला अनिल बाबुराव लोखंडे हे बेपत्ता होते. दोन दिवस शोधकार्य करून ही त्यांचा शोध महसूल व पोलीस पथकास लागला नाही.
झाडात आढळला मृतदेहदरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील बचाव व सुरक्षा पथकास पाचारण करण्यात आले. त्यांनी धारूर येथील नगरपरीषदेच्या अग्निशामक दलासोबत शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, आज सकाळी घटनास्थळापासून काही अंतरावर नदीपात्राच्या बाजूला झाडीमध्ये अडकलेला एक मृतदेह आढळून आला. मृताचा चेहरा माशांनी तोडल्यामुळे विद्रूप झाला होता. कपडे आणि नातेवाइकांनी सांगितलेल्या वर्णनावरून तो मृतदेह चालक अनिल बाबुराव लोखंडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
यांनी राबवली शोध मोहीमवाहून गेलेल्या चालकाच्या शोध मोहिमेत छत्रपती संभाजीनगर येथील बचाव व सुरक्षा पथकातील संपत भगत, अशोक खांडेकर, एच वाय घुगे, दिनेश मुंगसे, संग्राम मोरे, एन आर घुगे, धारूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाचे बालासाहेब शिनगारे, संजय गायसमुद्रे यांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी तहसीलदार श्रीकांत निळे, नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, वरिष्ठ लिपिक प्रकाश गोपड, मंडळ अधिकारी कपिल गोडसे, पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, उपनिरीक्षक बाबासाहेब भवर, नाना निगुळे आदि महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन दिवस घटनास्थळी तळ ठोकून शोध मोहीम राबवली.