बीड : जिल्ह्यातील रहिवासी असलेले दाम्पत्य मागील दीड वर्षांपासून इंग्लमध्ये वास्तव्यास होते. परंतु कुटुंबाला भेटण्यासाठी हे दाम्पत्य २२ डिसेंबरला भारतात आले आणि त्यांना विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये नेऊन क्वारंटाइन केले. सहाव्या दिवशी चाचणी केली असता आठव्या दिवशी त्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. आता हे दाम्पत्य मुंबईहून गावाच्या दिशेने रवाना झाले आहे. आता गावातही आल्यावर आपण क्वारंटाइन राहणार असल्याचे या दाम्पत्याने ‘लोकमत’ला सांगितले. आरोग्य विभाग त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.
माजलगाव तालुक्यातील लऊळ येथील २९ वर्षीय पुरुष व्यक्ती पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीस आहे. दोन वर्षांसाठी त्यांना इंग्लंडमध्ये पाठविण्यात आले. ते आपल्या २७ वर्षीय पत्नीसह दीड वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहतात. परंतु इकडे आईची तब्येत खराब झाल्याने ते भेटण्यासाठी गावी आले. त्यांना भारतातील नियमांची कल्पना नसल्याने ते तेथून निघाले आणि मुंबईत अडकले. २५ दिवसांच्या सुट्या घेऊन गावी आलेल्या या व्यक्तीचे ८ दिवस क्वारंटाइनमध्येच गेले.
नागरिक गाफील राहत असल्याचे वास्तव
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिक गाफील राहत असून काळजी घेत नाहीत. परंतु अद्यापही धोका टळलेला नसून काळजी घ्यावी.
विदेशातून २०० पेक्षा जास्त लोक भारतात
जिल्ह्यात १६ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आष्टी तालुक्यातील इटकूर येथे आढळला. तेव्हापासून जिल्ह्यात जवळपास २०० लोक विदेशातून आलेले आहेत. या सर्वांना संस्थात्मक व गृह अलगीकरण करून कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील जवळपास १० लोक कोरोनाबाधित आढळले होते. या सर्वांवर आरोग्य विभाग नजर ठेवून होता.
विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?
मागील १८ दिवसांत विदेशातून किती लोक आले, याची माहिती संबंधित आरोग्य विभागाला विमानतळावरून देण्यात आली. बीडमधील लवूळ क्रमांक १ मधील दाम्पत्य आल्याचे समजले. परंतु त्यांना विमानतळावरच शोधून हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले. त्यांची दोन दिवसांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी केली असता मंगळवारी अहवाल निगेटिव्ह आला.
आरोग्य विभाग संपर्कात
मागील २८ दिवसांत विदेशातून जिल्ह्यातील रहिवासी असलेले दोघे मुंबईत क्वारंटाइन केले. त्यांच्या नियमित संपर्कात आहोत. दोघांचीही चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी १४ दिवस संपर्कात राहू.
- डॉ.आर.बी. पवार,
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड