- मधुकर सिरसटकेज ( बीड) : अभिनेते आमीर खान यांच्यानंतर आज सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. अभिनेते शिंदे मस्साजोग येथे मंगळवारी (दि.1 ) सकाळी 11 वाजता आले. सरपंच संतोष देशमुख यांच्या आईसह देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन अभिनेते शिंदे यांनी त्यांचे सांत्वन करत धीर दिला.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी धनंजय देशमुख यांच्याशी सविस्तर संवाद साधला. मला देशमुख कुटुंबियांची काळजी वाटते. याच भावनेतून त्यांची भेट घेऊन सांत्वन केले, असे सांगत शिंदे यांनी आपण देशमुख कुटुंबियांसोबत आहोत, असे सांगितले. न्यायाच्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत. देशमुख कुटुंबियांना न्याय लवकर मिळाला पाहिजे, अशी मागणी शिंदे यांनी केली. तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्यातील चांगुलपणा, त्यांचे समाजकार्य अजरामर राहावे यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, शेकापचे भाई मोहन गुंड आणि पाणी फाउंडेशनचे शिवराज घोडके होते.