अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी (घाट) गावात दुपारी गाव जेवण कार्यक्रमानंतर सुमारे २०६ जणांना विषबाधा झाली. यातील ३५ गंभीर रुग्णांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर रुग्णांवर आरोग्य विभागाच्या टीमने गावातच उपचार केले.
पिंपरी येथे जागृत हनुमान देवस्थान आहे. इथे या मंदिरात भक्त गावजेवण देण्याची प्रथा पाळतात. बुधवारी दुपारी गावात गाव जेवणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पहाटेपासून अनेकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी अशा तक्रारी जाणवू लागल्या. यानंतर ग्रामस्थांना घेऊन सरपंच काशिनाथ कातकडे यांनी त्वरित स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेतली. अपघात विभागातील सीएमओ मारुती आंबाड, सर्व परिचारिका, कर्मचारी यांच्यासह राहुल गित्ते यांनी तातडीने रुग्णांना दाखल करून घेत उपचार सुरू केले. आता त्या ३५ रुग्णांची प्रकृती स्थिर झाली आहे. तर विषबाधा झाल्याचे लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातच उपचार केले. सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, आमदार धनंजय मुंडे यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून बाधितांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आणि योग्य त्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
आरोग्य विभागाची टीम पिंपरीमध्ये तळ ठोकूनपिंपरी येथील ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचे समजताच तालुका आरोग्य अधिकारी बाळासाहेब लोमटे यांनी घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरातील आरोग्य व उपकेंद्रातील सर्व डॉक्टर्स व कर्मचारी यांना औषधी साठ्यासह गावात पाठविले. त्यांनी स्वतः याठिकाणी भेट देत रुग्णांवर गावातच उपचार केले. आता सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. लोमटे यांनी सांगितले.
भातातून विषबाधा झाल्याचा निष्कर्षगाव जेवणासाठी जवळपास १ हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. वरण, भात, भाजी, पोळी, मठ्ठा, बुंदी असा जेवणाचा बेत होता. कडक ऊन व लवकर शिजवलेला भात व उशिरा झालेले जेवण यामुळे भातातून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.