शिवाजीनगर पोलिसांच्या माहितीनुसार महावितरणची सध्या थकबाकीदार ग्राहकांकडून वीजबिल वसुलीची मोहीम सुरू आहे. महावितरणच्या शहर पथकात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले दत्ता हगारे हे मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास वीजबिल वसुलीसाठी केएसके महाविद्यालयासमोर गेले होते. सोबत चार कर्मचारीदेखील होते. महाविद्यालयासमोर शेषराव भीमराव उबाळे यांचे कॉम्प्लेक्स असून, विजेची राहिलेली थकबाकी भरा, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी ‘वीजबिल भरत नाही काय करायचे ते करा’, असे उत्तर त्यांना मिळाले. वीजपुरवठा खंडित केल्यावर तेथे कुलदीप शेषराव उबाळे हा आला. त्याच्यासोबत कॉम्प्लेक्समधील तीन ते चार किरायादारदेखील होते. त्यांनी हगारे यांना धक्काबुक्की करून त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली, त्यानंतर त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची व कोंडून ठेवण्याची धमकी दिली. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी सोडवासोडव केली. यानंतर हगारे यांनी शिवाजीनगर ठाण्यात कुलदीप उबाळेसह इतर तीन ते चार जण अनोळखींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस अधिकारी करत आहेत.
थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST