बीड : तालुक्यातील पिंपळवाडी येथे शेतीच्या वादातून चुलत्याला कुऱ्हाडीने मारहाण करीत दोघांनी गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी चुलत्याच्या फिर्यादीवरून पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळवाडी येथील जगन्नाथ एकनाथ बहिरवाळ (रा. पिंपळवाडी, ता.बीड), असे कुऱ्हाडीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. यांची पिंपळवाडी येथे शेती आहे. शेतात लावलेला ऊस त्यांनी जनावरांना खायला टाकला होता. मात्र, त्यांचा पुतण्या कृष्णा कान्हू बहिरवाळ आणि केशव यांनी ‘आता हे शेत आम्हाला दे, तू ऊस तोडू नको’, असे म्हणत भांडणाची कुरापत काढून कुऱ्हाड, दगडाने मारहाण करीत जगन्नाथ बहिरवाळ यांना गंभीर जखमी केले. या मारहाणीत जगन्नाथ यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झाली असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नेकनूर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात येऊन बहिरवाल यांची शनिवारी तक्रार नोंदवून घेतली, तसेच मारहाण करणारे पुतणे कृष्णा आणि केशव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.