रिक्षातून अवैध वाहतूक
वडवणी : बीड, वडवणी, तेलगाव या महामार्गावर रिक्षा, जीपमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक शाखेने या भागातही विशेष मोहीम राबवून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी आहे.
चुंबळी फाटा ते सौताडा रस्ता खराब
पाटोदा : तालुक्यातील चुंबळी फाटा ते सौताडा या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. बीड-नगर या मार्गावरील वाहनांची मोठी वर्दळ राहते. परंतु गेल्या काही दिवसात चुंबळी फाटा ते सौताडा या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. शिवाय या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
आरोग्यास धोका
बीड : शहरातील सावतामाळी चौक आणि परिसरातील नाल्या तुंबल्या आहेत. नगरपालिकेकडून वेळेवर स्वच्छता होत नसल्याने या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चिकुन गुनिया, डेंग्यू यासारख्या आजाराचे रुग्ण येथे आढळत आहेत. त्यामुळे येथे स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी आहे.
दुचाकी चोऱ्या वाढल्या
बीड : येथील अनेक शासकीय कार्यालय परिसरात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाहन परत मिळेल याची खात्री नाही. यामुळे अनेक जण तक्रारही नोंदवत नाहीत. यामुळे नागरिकांना मात्र फटका बसत आहे.
माजलगाव तहसील परिसरात अस्वच्छता
माजलगाव : येथील तहसील कार्यालयात सर्वच विभागात कचरा दिसत असल्याने तहसील परिसर अस्वच्छ दिसत आहे. तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता करण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे. परंतु अद्यापही स्वच्छता न करण्यात आल्याने कामासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिसर स्वच्छतेची मागणी होत आहे.