यंत्रणा सुस्त : कोणी नियम पाळेना प्रशासनाला ताळमेळ लागेना
कडा : जिल्ह्यातील इतर तालुक्यांत कोरोना उतरणीला लागला असताना आष्टी तालुक्यातील आकडा कमी होताना दिसत नाही. कोणीच नियम पाळत नसल्याने याचा कसलाच ताळमेळ प्रशासनाला बसत नसल्याने कोरोना रोखण्यात अपयश येत असल्याचे रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे.
आष्टी तालुक्यात दुसऱ्या लाटेत शेवटच्या टप्प्यात कोरोना रुग्ण कमी झाल्याचे दिसून येत असल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल केले. जिल्ह्यातील इतर तालुक्यांत आकडा कमी झाला असला, तरी हाच आकडा आष्टी तालुक्यात मात्र वाढताना दिसत आहे. तालुक्यातील प्रशासन गप्पगार असून नागरिकांना कसलाच धाक व भीती राहिली नसल्याने सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.
ना मास्क ना सोशल डिस्टन्स, लग्न समारंभात तोबा गर्दीवर नियंत्रण ठेवणाऱ्या महसूल, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामसुरक्षा समिती सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील प्रशासनाला कसलाच ताळमेळ बसत नसल्याने व नागरिक नियम पाळत नसल्याने कोरोनाला उतरणीचा पुन्हा सक्रिय झाला आहे. तालुक्यातील ही वाढती रूग्णसंख्या विचार करायला लावणारी असून प्रशासनाने पुन्हा एकदा सक्रिय होऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.
ग्रामसुरक्षा समितीला सूचना
दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या पाहता पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामसेवकांना जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांकडून कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन करून घेण्याबाबत ग्रामसुरक्षा समितीला आदेशित केले असल्याचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी सांगितले.
नियम पाळा
तालुक्यात सध्या कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुखणे अंगावर न काढता लक्षणे जाणवताच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखवावे. आपल्यासोबतच कुटुंबाची काळजी घ्यावी. आरोग्य विभाग सक्रिय असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे म्हणाले.
कंटेनमेंट झोन केले
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाढत्या रुग्णसंख्येला अटकाव घालण्यासाठी निर्बंध घालून दिले आहेत. काॅन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असून रुग्ण जास्त आढळून येणाऱ्या गावात कंटेनमेंट झोन करण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी आवश्यक तेथे चाचण्या तसेच उपाययोजना सुरू असल्याचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी लोकमतला सांगितले.