बीड : जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत दुचाकी चोराला अटक केली असून, १५ दुचाकी त्याच्याकडून ताब्यात घेतल्या आहेत.
लक्ष्मण बाबुराव पवार (रा. इमामपूर रोड, ढोले वस्ती, बीड) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. विविध पोलीस ठाण्यांत दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी चोराचा शोध घेत होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि भारत राऊत यांना ९ एप्रिल रोजी इमामपूर रोडवरील ढोले वस्ती परिसरात राहणारा रेकॉर्डवरील आरोपी लक्ष्मण बाबुराव पवार याच्या घरात चोरीच्या दुचाकी लपवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सापळा रचून मुद्देमालासह दुचाकी चोर लक्ष्मण पवार याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच ७ दुचाकी बीड शहर व परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुन्हा विचारणा केली असता, काही चोरीच्या दुचाकी ओळखीतल्या भीमा बबन जाधव (रा. कठोडातांडा, ता. गेवराई) व संदीप सोळुंके (रा. निपाणीटाकळी, ता. माजलगाव) याच्याकडे ठेवल्याचे सांगितले. दरम्यान, भीमा जाधवकडून ५ व संदीप सोळुंके याच्याकडून ३ दुचाकी अशा एकूण १५ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील दुचाकी चोरी करणारी टोळी ताब्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा अपर अधीक्षक सुनील लांजेवारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि भारत राऊत यांच्या पथकाने केली.
मोबाइल चोर ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाइल चोरीप्रकरणी सुमित नवनाथ राठोड (रा. मठजवळगाव, ता. अंबड जि. जालना) यालादेखील ९ एप्रिल रोजी ताब्यात घेतले आहे. त्याला पुढील तपासासाठी तलवाडा पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
===Photopath===
100421\102_bed_18_10042021_14.jpg
===Caption===
स्थानिक गुन्हे शाखेचे दुचाकीसह चोराला अटक केल्यानंतर पथक प्रमुख पोनि भारत राऊत व अधिकारी कर्मचारी