केज : तालुक्यातील कुंभेफळ येथे परिसरातील पंधरा गावच्या शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी बैलगाड्या रस्त्यावर आडव्या लावल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली होती.
अत्यल्प झालेल्या पावसामुळे तालुक्यातील पिके पावसाअभावी वाळून गेल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. करपलेल्या पिकांचे पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपये मदत द्यावी, खरीप हंगाम 2017, रब्बी हंगाम 2018 चा पिक विमा तात्काळ देण्यात यावा, पशुधनासाठी दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांसाठी तालुक्यातील १५ गावच्या शेतकऱ्यांनी एक तास रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनात कुंभेफळ, बंकरांजा, होळ ,चंदनसावरगाव ,सोनिजवळा, भाटुंबा, पिसेगाव ,जवळबन ,जानेगाव, ढाकेफळ, सारणी (आ) आनंदगाव (सा) व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग होता. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांना देण्यात आले. यावेळी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.