बीड : प्रत्येक शासकीय कार्यालयाचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट होणे आवश्यक असते. परंतु बीडमध्ये चक्क महावितरण कार्यालयानेच आपल्या कार्यालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ कार्यालयातील जवळपास दीड हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
जिल्ह्यात बीड मंडळ कार्यालयांसह बीड व अंबाजोगाई असे दोन विभाग आणि बीड शहर, बीड ग्रामीण, गेवराई, पाटोदा, शिरूरकासार, आष्टी, तेलगाव, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, केज असे १२ उपविभागीय कार्यालये आहेत. यामध्ये १३७८ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यालयांची अवस्था अतिशय बिकट झालेली दिसते. नुकतेच भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर शासनाने प्रत्येक रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे आदेश दिले. हाच धागा पकडून लोकमतने महावितरण कार्यालयांनीच इलेक्ट्रिक ऑडिट केले का, याची माहिती घेतली असता एकाही कार्यालयाचे ऑडिट झाले नसल्याचे समोर आले.
दरम्यान, बीड शहरातील माळीवेस उपविभागीय कार्यालयात पाहणी केली असता सर्वत्र वायर मोकळे आहेत. ठिकठिकाणी जोड व्यवस्थित नाहीत. त्यामुळे कोणत्याही वेळी शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढे गंभीर असतानाही महावितरणकडून याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे.
कोट
चालू वर्षात कार्यालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही. चार-दोन दिवसांत इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरकडून इलेक्ट्रिक ऑडिट करून घेऊ. फायर ऑडिटचे यापूर्वीच कंत्राट काढले होते. परंतु काम न केल्याने संबंधितांवर योग्य ती कारवाई झाली आहे. आता पुन्हा नव्याने प्रक्रिया केली जाईल.
रवींद्र कोळप
अधीक्षक अभियंता, महावितरण बीड
----
जिल्ह्यातील एकूण अधिकारी, कर्मचारी - १,३७८
जिल्ह्यातील एकूण कार्यालये - १५