बीड : कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात सध्या १४ केंद्रे सुरू असून, यामध्ये केअर सेंटर तसेच शासकीय व खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. १५६८ खाटांची क्षमता असून, एक हजार ९८ खाटांना मान्यता दिली आहे. २४१ खाटांचा वापर सुरू असून, ८५६ खाटा रिक्त आहेत.
१५ हजार ८७१ रुग्ण झाले कोरोनामुक्त
बीड : जिल्ह्यात २७ डिसेंबरपर्यंत १६ हजार ६४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. पैकी १५ हजार ८७१ रुग्ण काेरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९५.३३ इतका आहे. लॉकडाऊन आणि नियम प्रशासनाकडून जसजसे शिथिल झाले, तसतसे नागरिकांकडून मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात नसल्याचे अद्यापही दिसत आहे.
गतिरोधकाचा अडथळा
बीड : शहरातील पेठ भागामध्ये रंगार गल्ली, विठ्ठल मंदिरापासून शनि मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर गतिरोधक नियमानुसार केलेले नाहीत. उंच असलेल्या गतिरोधकांमुळे वाहने चालविण्यासाठी अडचणी येत आहेत. अनेकदा अपघातही झाले आहेत. त्यामुळे गतिरोधकांची उंची कमी करण्याची मागणी होत आहे.
पेव्हर ब्लॉक खचू लागले
बीड : शहरातील अंबिका चौक, भाजी मंडई, शासकीय रुग्णालय परिसरातील रस्त्यांवर टाकण्यात आलेले पेव्हर ब्लॉक खचू लागले आहेत. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. खचलेले रस्ते व पेव्हर ब्लॉकची दबाई करण्याची मागणी आहे.
चहाला मागणी वाढली
बीड : आठवडाभरात वातावरणातील तापमानात घट झाल्याने थंडीचे प्रमाण वाढले आहे. थंडीपासून बचावासाठी शेकोटी तसेच उबदार कपड्यांचा वापर लोक करीत आहेत. त्याचबरोबर सायंकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल, चहाच्या गाड्यांवर गर्दी वाढत आहे. गुळाचा चहा, साधा चहा, डिकाशनला मागणी आहे.
बीडमध्ये सर्वाधिक रुग्ण
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. रविवारी आढळलेल्या ३० बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण बीड शहरासह चव्हाणवाडी, चऱ्हाटा, चौसाळा भागातील आहेत. एकूण १३ रुग्ण तालुक्यातून बाधित आढळले आहेत. सर्वांत कमी रुग्ण केज, माजलगाव व वडवणीत आढळले.
दत्त मंदिरात दीपोत्सव
बीड : शहरातील सुभाष रोडवरील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीनिमित्त वेदमूर्ती अनंत शास्त्री मुळे यांची भागवत कथा सुरू आहे. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मंदिरामध्ये दीपोत्सवाचे आयोजन केले असून, रात्री स्थानिक कलावंतांच्या उपस्थितीत संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड : येथील मराठा उद्योजक लॉबी व स्माईल फाउंडेशनतर्फे डी.पी. रोड, सहयोगनगरमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. सीए ज्ञानेश्वर खांडे, सिद्धेश्वर क्षीरसागर, धनंजय गुंदेकर, योगेश नरवडे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुरुवात झाली. यावेळी २७ दात्यांनी रक्तदान केले. आयोजक प्रशांत लांडे, शिवप्रसाद घोडके, अमोल जगताप, अशोक होळकर, भागवत तावरे, अजय सुरवसे, विलास काकडे, अनिरुद्ध क्षीरसागर, बिभीषण क्षीरसागर, जगदीश पैठणे, आदी उपस्थित होते.
उपोषणाचा इशारा
धारूर : शहरातील डोंगरवेस भागात मुख्य रस्त्यावर नालीचे पाणी पसरून दुर्गंधी वाढली आहे. नालीवर ढापा नसल्याने ही परिस्थिती आहे. या भागातील मुख्य रस्त्याची डागडुजी करून स्वच्छतेची कामे न केल्यास उपोषणाचा इशारा परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.