तौफीक अकबर शेख असे त्या फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. बीड पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयात ते विशेष शिक्षक आहेत. ९ ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या मोबाइलवर शारीक सर या मित्राच्या फेसबुक खात्यावरून मेसेज आला आणि त्याद्वारे महत्त्वाच्या कामासाठी १० हजारांची मागणी करण्यात आली. मित्राचे काम आहे, असे समजून तौफीक शेख यांनी त्याने दिलेल्या बँक खात्यावर १० हजार रुपये जमा केले. त्यानंतर, त्या फेसबुक खात्यावरून रुग्णालयाचे कारण सांगून वेगवेगळ्या रकमेची मागणी करण्यात आली. मित्र खूपच अडचणीत आहे, असे समजून तौफीक शेख यांनी कुठलीही खातरजमा न करता, त्या भामट्याच्या खात्यावर एकूण ८४ हजार ९८० रुपये जमा केले. व्यवहाराबाबत शंका आल्याने त्यांनी शारीक सर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फेसबुक खाते हॅक झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर, तौफीक शेख यांनी रक्कम पाठविलेल्या फोन पेचा नंबर तपासला असता, तो निलोफर अजिज शेख नावाने दिसून आला. या प्रकरणी तौफीक शेख यांच्या फिर्यादीवरून निलोफर अजिज शेख या अनोळखी व्यक्तीवर बीड शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
फेसबुक हॅक करून शिक्षकाला ८५ हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST