माजलगाव : तालुक्यातील केसापुरी शिवारात प्लॉटिंगमध्ये अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी १०० ब्रास मुरुमाची रॉयल्टी करून ५५० ब्रास मुरूम उपसा केल्याचे महसूलच्या चौकशी अहवालात समोर आले. परंतु, महसूलकडून केवळ या मुरूम चोरट्यांना नोटीस बजावून सोपस्कर पार पाडले. ही नोटीस देऊन महिना उलटत आला असताना कसलीच कारवाई करण्यात न आल्याने महसूल प्रशासनाबाबत शंका निर्माण होत आहे.
माजलगाव तालुक्यात सर्रास शासनाच्या गौण खनिजाची चोरी होत आहे. असाच प्रकार केसापुरी शिवारातील गट क्र. १२ मध्ये समोर आला. प्लॉटिंगतील अंतर्गत रस्ते निर्माणासाठी शेकडो ब्रास मुरुमांचा वापर केल्याचे दिसून आले. ‘लोकमत’ने एक महिन्यापूर्वी याबाबत वृत्त प्रकाशित मुरूम चोरीचा प्रकार
समोर आणला. यावर तहसीलदार वैशाली पाटील यांनी मंडळ अधिकारी कृष्णा पुराणिक, तलाठी एल.एन. मुळे यांना पंचनामा करण्याचे २ डिसेंबर २० रोजी आदेश दिला. त्यानुसार त्यांनी सदरील प्लॉटिंगमध्यील अंतर्गत रस्त्यांसाठी वापरण्यात आलेल्या मुरुमाचे मोजमाप केले. तसेच ज्या भागातून १०० ब्रास मुरुमांच्या उत्खननांचा परवाना दिला होता, त्या ठिकाणचे मोजमाप केले. त्यात ५५० ब्रास मुरूम उत्खनन केला असल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारचा अहवाल मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तहसीलदार यांच्याकडे दिला आहे. हा अहवाल तहसीलदार यांना सादर करून आज महिना उलटत येत असतानाही अद्याप मुरूम चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. मात्र तहसीलदारांनी केवळ नोटीस बजावून सोपस्कर पार पाडत एक प्रकारे मुरूम चोरट्यांना अभय दिले आहे. माजलगाव तालुक्यात दिवसेनदिवस महसूलकडून पाठराखण होत असल्याने मुरूम, वाळू चोऱ्यांचे प्रमाणे वाढत चालले आहे. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडला जात असून, गाैण खनिजाची अवैध चोरी होत आहे.
नोटीसचे उत्तर आल्यावर पाहू
केसापुरी शिवारातील प्लॉटिंगसाठी अवैद्य मुरूम उत्खननप्रकरणी संबंधितांना मागील महिनाभरापूर्वी नोटीस बजावली आहे. त्याचे उत्तर त्यांनी अद्याप दिलेले नाही. त्यामुळे आम्ही कारवाई केलेली नाही, असे तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितले.