बीड : जिल्हा रुग्णालय व परिसरात सध्या स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. जवळपास ४० ट्रॅक्टर कचरा या ठिकाणाहून काढण्यात आला आहे. त्यामुळे परिसर चकाचक दिसत आहे. याचा आढावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी घेतला आहे.
जिल्हा रुग्णालय व परिसरात रुग्ण, नातेवाईकांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. तसेच कोरोनाकाळात परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले होते. आता पदभार स्वीकारताच डॉ. गित्ते यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. रुग्णालयाचा सर्व परिसर स्वच्छ करून घेतला आहे. तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राचा परिसरही स्वच्छ केला आहे. जवळपास ४० ट्रॅक्टर कचरा निघाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गित्ते यांनी सांगितले. तसेच वारंवार आपण स्वच्छतेचा आढावा घेत असल्याचेही ते म्हणाले.
स्वच्छतेवर विशेष लक्ष
रुग्णालय व परिसरात कोठेही घाण दिसणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. स्वच्छता करण्यासाठी वारंवार सूचना केल्या जातील. तसेच स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाईल, असेही डॉ. गित्ते यांनी सांगितले.