लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील मौजवाडी वस्तीवरील तुटलेली तार जोडण्यासाठी १४०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दाखल गुन्हा सिध्द झाल्याने महावितरणच्या बीड येथील पथक क्रमांक दोन मधील लाईनमन हेल्पर मोहन राख यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्या. व सहाय्यक सत्र न्या. क्र. ३ उल्हास पौळ यांनी बुधवारी सुनावली.मौजवाडी वस्तीवरील तुटलेली तार जोडण्यासाठी तक्रारदार आणि त्याचा सहकारी गोपी ढेंगे या दोघांकडून १४०० रुपयांच्या लाचेची मागणी लाईनमन हेल्पर मोहन राख याने केली होती. त्या संदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर ३१ डिसेंबर २०१३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मोहन राख यास लाच स्वीकारताना पंच साक्षीदारांसमक्ष रंगेहाथ पकडले होते. तत्कालीन पो. नि. विनय बहीर यांनी तपास करुन दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. याप्रकरणी ३० जानेवारी रोजी न्यायालयाने निकाल दिला.लोकसेवक मोहन भगवान राख हा दोषी ठरल्यामुळे त्यास लाचलुचत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम १३ (१) (ड) सह १३ (२) नुसार तीन वर्षे सक्तमजुरी तसेच दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली.सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता मिलिंद वाघीरकर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील व पो. ह. बी. बी. बनसोडे यांनी मदत केली.
लाच घेणाऱ्या लाईनमन हेल्परला ३ वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:17 IST