बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मागील २० दिवसांत वेगाने वाढल्याने चिंता वाढली आहे. मात्र मृत्यूप्रमाण ३८ ने घटले आहे. १ ते २१ मार्चदरम्यान ३० हजार ८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ हजार ५१८ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. १ मार्च रोजी जिल्ह्याचा मृत्यूदर (फेटालिटी) ३.०६ होता. मात्र २१ मार्च रोजी हे प्रमाण २.६८ पर्यंत कमी झाले आहे. २० दिवसात २३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आवश्यक असलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर २० दिवसांपूर्वी २३.१२ होता, मात्र सध्या हे प्रमाण ४ टक्क्यांनी कमी झाले आहे. रिकव्हरी रेटमध्येही अंशत: घसरण दिसत आहे. १ मार्च रोजी ९५.११, तर २१ मार्च रोजी हे प्रमाण ९१.८१ इतके राहिले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लाख ४४ हजार २४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात २ लाख २१ हजार ८९२ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह, तर २२ हजार ३५३ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. मार्चमध्ये रुग्णांचे आकडे वाढत असल्याने आरोग्य विभागाने तातडीने उपाय सुरू केले आहेत. जिल्ह्यात ३१९८ खाटांची क्षमता असून, २१४२ मंजूरपैकी १२२९ खाटांचा वापर सुरू आहे. सध्या ९१९ खाटा शिल्लक आहेत.
बीड जिल्ह्यात २० दिवसांत ३ हजार ५१८ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:35 IST