शिरूर कासार : शेजारच्या पाटोदा तालुक्यात बर्ड फ्लूच्या तपासणी अहवालाने शिरूर तालुक्यातही पशुवैद्यकीय विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. जवळपास पंचवीस हजार कोंबड्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी याबाबतीत लक्ष ठेवून आहेत. अतिवृष्टीनंतर कोरोना व आता बर्ड फ्लूसारख्या आजाराने जनजीवन वेठीस धरले आहे. त्यातच शेजारी पाटोदा तालुक्यातील तपासणी अहवालानंतर शिरूर तालुक्यातील कुक्कुट पालन व्यावसायिकांसह अन्य लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिरूरसह रायमोहा, घाटशिळपारगाव, ब्रह्मनाथ वेळंब, खालापुरी, मानुर, जाटनांदूर व पिंपळनेर अशा आठ गावांमध्ये पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. शिरूरच्या परिसरात किमान दहा हजारांवर तर अन्य गावात जवळपास पंधरा हजार कोंबड्या असल्याचे सांगण्यात आले. सध्या सुरू असलेल्या बर्ड फ्लूचा संभावित धोका लक्षात घेता पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी वेळोवेळी आढावा घेऊन आपल्या सर्व सहकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. हा आजार विषाणूजन्य व संसर्गजन्य असून यावर उपचार उपलब्ध नसल्याने याचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी सावधगिरी बाळगावी, कुठे पक्ष्याचा मृत्यू निदर्शनास आल्यास ताबडतोब आपल्या कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन डॉ. प्रदीप आघाव यांनी केले आहे.
२५ हजार कोंबड्यांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST