परळी : केंद्रीय महामार्ग विकास मंत्रालयाने बीड जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. केंद्र सरकारने रस्ते विकासासाठी दिलेल्या निधीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. परळी- गंगाखेड महामार्गासाठी २२४ कोटी व अन्य निधी मंजूर झाल्यानंतर विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या गटांकडून पाठपुराव्याला यश आल्याचे सांगून श्रेयाचा दावा करण्यात आला आहे.
बीड शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे नूतनीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिकांमधून होत होती. या प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन रस्त्याच्या कामांचे तात्काळ अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच यासंदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी देण्याचे आश्वासन दिले होते.
गडकरींंनी स्वत: ट्वीट केले
परळी ते गंगाखेड (३६१एफ) या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने २२४.४४ कोटी रुपये निधी मंजूर केल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः ट्वीट करून दिल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वतीने सांगण्यात आले. दुर्दशा झालेल्या परळी ते गंगाखेड रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी धनंजय मुंडे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊनही अनेक वेळा विनंती केली होती.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास अखेर यश मिळाले असून, लवकरच या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान बीड शहरातील बायपासला जोडणाऱ्या जिरेवाडी ते बार्शी रोडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आणखी निधीची मागणी करणार
परळी ते गंगाखेडशिवाय बीड जिल्ह्यातील अन्य प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ७५ कोटी रुपये निधी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या अन्य राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी नितीन गडकरी यांच्याकडे आणखी निधीची मागणी येत्या काळात करणार असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
तीन वर्षांपासून पाठपुरावा
भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री असताना २८ फेब्रुवारी २०१८ रोजी परळी-गंगाखेड या ३६१ एफ राष्ट्रीय महामार्गासाठी निधी देण्याची मागणी नितीन गडकरी यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. तसेच खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. मुंडे भगिनींनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेतल्याचे त्यांच्या गटाकडून सांगण्यात आले.
केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून असा निधी मंजूर
बीड शहरातून जाणाऱ्या रस्त्यासाठी ५६ कोटी
जिल्ह्यातील अन्य रस्त्यांसाठी केंद्रीय मार्ग निधीतून ७५ कोटी
परळी- गंगाखेड महामार्गासाठी २२४ कोटी ४४ लाख