बीड : जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित गावांमध्ये रणधुमाळी पाहायला मिळत होती. यंदा १२९ पैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे १११ ग्रामपंचायतींसाठी १ हजार ८४८ उमेदवार रिंगणार उतरले असून, यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ४ जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. १८ तारखेला निकाल लागणार आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यंदा मुख्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील उडी घेतली असून, जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी सर्वच नेते कामाला लागले आहेत. त्यांच्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
ग्रामपंचायतींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून योग्य ते नियोजन करण्यात आले आहे, तर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतदेखील प्रशासनाने दिले आहेत.
तलवाडा, मादळमोही, दिंद्रूड ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष
जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये गेवराई तालुक्यातील तलवाडा व मादळमोही या गावांचा समावेश आहे, तर माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड या गावाचा देखील समावेश आहे. मोठ्या ग्रामपंचायती असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर मोठ्या ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी नेतेदेखील कामाला लागले आहेत.
बीड तालुक्यातील ५ ग्रामपंचायती बिनविरोध
बीड तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी मौज- ब्रह्मगाव, मौजवाडी, काटवटवाडी, वंजारवाडी, कोळवाडी या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या पालवन ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेणे व इतर कारणांमुळे तहसील कार्यालयात वाद झाला होता. हा वाद जिल्हाधिकारी यांच्या दालनापर्यंत गेला होता.
पुरुषांपेक्षा महिला उमेदवार जास्त
महिला आरक्षणामुळे ५० टक्के जागेवर महिला उमेदवार उभ्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणी खुल्या जागेवर देखील महिला उमेदवार उभ्या असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुरुष उमेदवारांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींवर महिलाराज असणार आहे.
प्रतिक्रिया
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत यामध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हक्क बजवावा, निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडतील, असे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-प्रकाश आघाव पाटील, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, बीड