लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. परंतु केवळ आधार लिंक नसल्याने गतवर्षी तब्बल १ हजार ६३३ विद्यार्थी शिष्यवृतीपासून वंचित राहिले होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मागासवर्गीय विदयार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफी योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती यांचा समावेश होतो. इयत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात. कोरोनामुळे शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना घरात किंवा ऑनलाईन, डिजिटल किंवा ऑफलाईन पध्दतीने शिक्षणाचे नियोजन करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत, त्यामध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्षातील उपस्थिती शिथील करण्यात आलेली आहे. तसेच सदर विद्यार्थ्यांचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने स्वीकारून योजनेचा लाभ आधार संलग्नित बँक खात्यावर ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. महाडीबीटी योजना कार्यान्वित होईपर्यंत सदर योजनेचा लाभ ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २६ जानेवारी २०२१ आहे. त्यानंतर एकही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अडचणी असतील तर समाजकल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.
कोट
सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे बंधनकारक आहे. गतवर्षी हे कार्ड एनपीसीआयद्वारे लिंक न केल्याने १,६३३ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. सर्वांनी ते लिंक करावे.
डॉ. सचिन मडावी
सहायक आयुक्त, समाजकल्याण बीड