शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात सध्या आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, १४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य अजमावीत आहेत. या निवडणुकीसाठी २५० नागरिकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर २४६ अर्ज शिल्लक होते. शेवटच्या दिवशी १०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
तालुक्यातील रायमोहा, हाटकरवाडी, येवलवाडी, टाकळवाडी, सांगळवाडी, भानकवाडी, कान्होबाची वाडी, कोळवाडी या आठ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे.
रायमोहा ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या अकरा सदस्यसंख्येसाठी ४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तेथे २३ उमेदवार रिंगणात आहेत. हाटकरवाडीच्या ७ जागांसाठी ३० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १४ जणांनी माघार घेतली. त्यामुळे तेथे १६ उमेदवार आपले भवितव्य अजमावीत आहेत. येवलवाडीच्या ९ सदस्यांसाठी ३४ उमेदवारी अर्ज होते. मात्र, १६ जणांनी माघार घेतल्याने तेथे १८ उमेदवार रिंगणात आहेत. टाकळवाडीच्या ९ जागांसाठी ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी १७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तेथे २१ उमेदवार आपले भवितव्य अजमावीत आहेत.
सांगळवाडीच्या ७ जागांसाठी २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तेथे १५ उमेदवार भवितव्य अजमावीत आहेत. भानकवाडीच्या ७ जागांसाठी १९ उमेदवारी अर्ज होते, तेथे ५ जणांनी माघार घेतली. त्यामुळे तेथे आता १४ उमेदवार लढत आहेत. कान्होबाची वाडीच्या ७ जागांसाठी २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तेथे १४ उमेदवार भवितव्य अजमावीत आहेत.
कोळवाडीच्या ७ जागांसाठी २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे तेथे १८ उमेदवार भवितव्य अजमावीत आहेत. अशा एकूण ६४ जागांसाठी २४६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, आता फक्त १४९ लोक निवडणूक रिंगणात आहेत. १०७ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणूक प्रक्रियेत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी केले आहे.