प्रशस्तिपत्र देऊन गौरव : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहकार्य
बीड : क्षयरुग्ण शोधण्यात आरोग्य विभागाला सहकार्य करणाऱ्या जिल्ह्यातील १३० खासगी डॉक्टरांना एकाचवेळी प्रशस्तिपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य विभागाने हा कार्यक्रम मंगळवारी घेतला.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभाग घेऊन नवे क्षयरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात जिल्ह्यातील १३० खासगी डॉक्टरांचा सहभाग आढळला. या सर्वांची यादी मागवित आरोग्य विभागाने त्यांना मंगळवारी प्रशस्तिपत्र देऊन गौरविले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गीत्ते, आयएमएचे डॉ. अनिल बारकुल, डॉ. अनुराग पांगरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनासारख्या कठीण काळात केलेले सहकार्य खरोखरच कौतुकास्पद आहेत. तसेच यापुढेही असेच प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन करीत सर्व माहिती कळवित राहावे. नव्या रुग्णांची माहिती निक्षय ॲपमध्ये भरण्याचे आवाहनही डॉ. पवार यांनी केले. डॉ. गीत्ते यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी खासगी डॉक्टरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.